
नांदेड - वाघाळा महानगरपालिकेच्या वतीने अनाथ, अपंग, मुकबधीर व बालकामगारांसाठी
आयोजित केलेल्या दीपोत्सवात चिमुकल्यांच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
आई- वडिलांचे छत्र नाही, घरात खेळण्या- बागडण्यास भाऊ - बहीण नाहीत, अशा अनाथ
बालकांनी दिवाळीच्या फटाक्यांसाठी कोणाकडे हट्ट धरावा. नव्या कपड्यांसाठी कोणापुढे
रूसावे... समाजापासून दूर राहिलेल्या कुष्ठधामातील मुलांनी आपल्या भावनांना कशी वाट
करून द्यावी, पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र राबणार्या हातांनी कशी धरावी सुरसुरी...
एकवेळ जेवणार्यांना कसली आली मिठाई...अशा अनेक प्रश्नांचे दायित्व स्वीकारून
महापालिकेने अनाथ, बालकामगार व गोरगरीब मुलांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरविला.
गोदाकाठी असंख्य दिव्यांच्या प्रकाशज्योती पेटवून आकाशात सप्तरंगी आतषबाजी करून
शहरातील अनाथ, मुकबधीर, अपंग, बालकामगार व गोरगरिबांच्या मुलांनी बुधवारी दिवाळी
साजरी करून आनंद लुटला. मनपाचे उपायुक्त शशिमोहन नंदा यांच्या संकल्पनेतून
साकारलेल्या दीपोत्सव या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने सांस्कृतिक क्षेत्रात नवी
पायवाट निर्माण करून दिली. दिवाळीच्या सणाचा आनंद गोरगरिबांच्या मुलांनाही घेता यावा,
यासाठी महानगरपालिकेच्या वतीने यंदा प्रथमच दीपोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन
नगिनाघाट येथे केले होते. यावेळी काढण्यात आलेल्या रांगोळ्या व संगीतमय मैफिलीने
वातावरण प्रसन्न झाले होते. सायंकाळी साडेसहा वाजता दीपोत्सवाचे उदघाटन गुरूद्वारा
बोर्डाचे अधीक्षक डी. पी. सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यानंतर अनाथ मुले,
बालकामगार मुलांनी एक- एक करून असंख्य दिव्यांच्या वाती नगिनाघाटावर
पेटविल्या.त्यामुळे सर्व परिसर प्रकाशाने उजळून निघाला.
दिवाळीनिमित्त शहरात कोट्यवधींची उलाढाल होत असतानाच गोरगरिबांच्या घरात मात्र
अंधार होता. पोटाची खळगी भरण्याची ज्यांना भ्रांत होती त्यांना कसली आली दिवाळी, असे
म्हणत गोरगरिबांची दिवाळी आली तशीच निघून गेली. दिवाळी श्रीमंतांची, असे निमूटपणे
म्हणून दुसर्यांच्या अंगणातील फटक्यांचा आनंद घेणारे बालकामगार... चार भिंतीच्या आत
शासकीय रिवाजात वाढणारे अनाथ मुले... यांच्यासाठी दीपोत्सव आनंदाची पर्वणी ठरली.
सूर्य अस्ताला गेला आणि अंधारलेल्या गोदाकाठी लक्ष दीप उजळले. गोदावरीचे संथ प्रवाही
पाणी... थंड हवेची झुळूक व श्रीनिवास मुदखेडकर यांच्या प्रतिभेतून साकारलेल्या भव्य
रांगोळ्यांनी चैतन्य निर्माण झाले होते. बालकामगार शाळा, चिखलवाडी, केंद्रीय
बालकामगार शाळा मिल्लतनगर, सुमन बालगृह, नेरली कुष्ठधाम व अंपग, मुकबधीर शाळेतील
मुलांनी परिसर गजबजून गेला होता. मान्यवरांनी सर्व मुलांचे स्वागत गुलाबपुष्प देवून
केले.
त्यानंतर वेगवेगळ्या रंगांची उधळण करणार्या आतषबाजीने चिमुकल्यांचा आनंद द्विगुणीत
झाला. हातातील सुरसुरीने भूईचक्र, भूईनळा पेटवून उधळणार्या चांदण्याची बरसात पाहून
मुलांनी टाळ्या वाजवून आपल्या भावनांना वाट करून दिली. या वातावरणात शेजारी मंचावर
सुरू असलेल्या संगीत मैफिलीने अधिकच भर टाकली होती. सच्चिदानंद डाखोरे व अश्विनी
जोशी यांच्या सुरांनी ओंकार स्वरूपा, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझे माहेर
पंढरी, सत्यं शिवमं सुंदरमं आदी गीते सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.
सुमन बालगृहातील प्रिया सुरेश खिल्लारे, संतोषी एटबहादूर या छोट्या मुलींनी खूप
मज्जा आली... या शब्दात आपला आनंद व्यक्त केला. सर्वांना मिठाई वाटप करून
कार्यक्रमाची सांगता झाली.